भाजपमध्ये दुफळी;शिवसेनेची भूमिका ठरणार निर्णायक 'स्थायी' च्या सभापती पदासाठी शिंदे, कुलकर्णी यांच्यात रस्सीखेच !

Foto


औरंगाबाद : महानगरपालिकेतील अर्थपूर्ण समिती असलेल्या स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक 4 जून रोजी होणार असून, या निवडणुकीपूर्वी मनपात चांगलेच राजकारण रंगत आहे. स्थायी समितीचे सभापतीपद यावेळी भाजपच्या वाट्याला आले असून, या पदासाठी भाजपमधील एका गटातर्फे राजू शिंदे तर दुसर्‍या गटातर्फे जयश्री कुलकर्णी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोघांपैकी कुणी माघार घेणार का? की तिरंगी लढत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती पदाकरिता जोरदार रस्सीखेच होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांच्याकडून अनपेक्षित व धक्‍कादायक पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजप-शिवसेना युतीत निर्माण झालेला तणाव पाहता स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून युती धर्माला फाटा देऊन दगाफटका होण्याची भीती भाजपच्या गोटात होती. प्रत्यक्षात मात्र झाले उलटेच. भाजपमध्येच सभापती पदाच्या उमेदवारीवरून चांगलेच नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. 

स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या वतीने राजू शिंदे व जयश्री कुलकर्णी या दोन नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, एमआयएमकडून नासिर सिद्दीकी यांनी अर्ज भरला आहे. शनिवारी तासाभराच्या चर्चेनंतर पहिल्यांदा राजू शिंदे व त्यापाठोपाठ जयश्री कुलकर्णी यांचा अर्ज सभापती पदाकरितदाखल करण्यात आला. शिंदे व कुलकर्णी या दोघांनीही स्थायीच्या सभापती पदासाठी अर्ज दाखल केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले. यानंतर कुलकर्णी या भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्याचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी स्पष्ट केले. महापालिकेत सेना-भाजप युतीची सत्ता असून, युतीमधील करारानुसार स्थायी समिती सभापती पद यंदा भाजपच्या वाट्याला आले आहे. सभापती पदाच्या शर्यतीत भाजपकडून कुलकर्णी आणि शिंदे हे दोन उमेदवार असल्याने यापैकी कोण माघार घेणार की, तिरंगी लढत होणार, अशी चर्चा सध्या रंगली आहे. अशा परिस्थितीत भाजपसमोर मात्र पेच वाढलेला असल्याचे दिसत आहे. 
 
शिवसेनेला वचपा काढण्याची संधी...
लोकसभा निवडणुकीत काही भाजप नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार खैरे यांचे काम केले नसल्याचे खुद्द खैरे यांनी जाहीरपणे सांगितले होते. या निवडणुकीत अतिशय कमी फरकाने खैरे यांचा पराभव झाला. अशा परिस्थितीत शिवसेनेने युतीधर्माला फाटा देऊन ही निवडणूक लढवावी, अशी स्थानिक पदाधिकार्‍यांची इच्छा होती; परंतु वरिष्ठ स्तरावरून युती धर्म पाळण्याचे संकेत मिळाले असल्याचे समजते.भाजपच्या दोन सदस्यांनी सभापती पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणे, त्यात अधिकृत सदस्याकरिता शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या सदस्यांनी ऐनवेळी धावपळ करीत सूचक, अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणे या सर्व घटनाक्रमामुळे ही शिवसेनेची खेळी असल्याचेही बोलले जात आहे. तिरंगी लढत झाल्यास शिवसेनेला लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळू शकेल, अशीही चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. 
स्थायी समितीत  शिवसेना- 6,एमआयएम-4,बीजेपी-3, शहर विकास आघाडी-2,काँग्रेस -1 अशा एकूण 16 सदस्याचा समावेश आहे.

माघार कोण घेणार याबाबत उत्सुकता...
सभापती पदासाठी उमेदवारी दाखल केलेले राजू शिंदे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे निकटवर्तीय असून, मनपातील गटनेते प्रमोद राठोड यांनी शिंदे यांचा अर्ज दाखल केला आहे. राठोड हे भाजप प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे समर्थक आहेत, तर जयश्री कुलकर्णी यांचे पती सुरेंद्र कुलकर्णी हे भाजप शहराध्यक्ष तनवाणी यांचे निकटवर्तीय समजले जातात. शिंदे यांनी यापूर्वी दोन वेळा स्थायी समितीचे सभापती पद भूषविले असून, शिवसेनेवर वचक ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना यावेळी पुन्हा सभापतीपदावर बसविण्यास भाजपमधील काहीजण उत्सुक आहेत. जयश्री कुलकर्णी यांचे पती सुरेंद्र कुलकर्णी यांची शिवसेना पदाधिकार्‍याशी जवळीक असून, आतापर्यंत स्थायीच्या सभापती पदावर पुरुष नगरसेवकांना संधी मिळालेली आहे. जयश्री कुलकर्णी यांच्या उमेदवारीने हे पद महिलांच्या वाट्याला येऊ शकते, असा एक मतप्रवाह आहे. अशा परिस्थितीत 4 जून रोजी दोघांपैकी कोण माघार घेणार काय? याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.